मविआच्या सर्व नेत्यांचा शपथविधीवर बहीष्कार, मात्र शरद पवारांचा ‘हा’ आमदार खास फडणवीसांसाठी उपस्थित

महायुतीने विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळवत मोठा विजय साजरा केला. भाजपने 132 जागांवर विजय मिळवत आपली ताकद दाखवून दिली, तर शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांनीही उल्लेखनीय कामगिरी केली. या विजयाच्या पार्श्वभूमीवर, आज आझाद मैदानावर महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडला.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्विकारली.

शपथविधी सोहळ्यासाठी राजशिष्टाचार विभागाने राज्यातील प्रमुख राजकीय नेते, उद्योगपती, खेळाडू, आणि सिनेस्टार्स यांना निमंत्रण दिले होते. मात्र, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या सोहळ्याकडे पाठ फिरवली. शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, सुप्रिया सुळे, आणि आदित्य ठाकरे यांसारख्या प्रमुख नेत्यांनी अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला.

शरद पवार गटाचा आमदार सोहळ्यात उपस्थित, चर्चांना उधाण
महाविकास आघाडीच्या अनुपस्थितीच्या पार्श्वभूमीवर, शरद पवार गटाचे माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील यांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली. त्यांची उपस्थिती राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे.

लोकसभा निवडणुकीदरम्यान अभिजीत पाटील यांनी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता. मात्र, नंतर ते शरद पवारांकडे परतले आणि राष्ट्रवादी पवार गटाकडून निवडणूक लढवून आमदार झाले. तरीही, फडणवीसांच्या शपथविधी सोहळ्याला त्यांनी उपस्थित राहिल्याने महाविकास आघाडीच्या भूमिकेबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.

राजकीय वर्तुळात चर्चा तापल्या
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शपथविधी सोहळ्यात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला असतानाही पवार गटाचा आमदार सोहळ्यात दिसल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत. हा निर्णय व्यक्तिगत होता की त्यामागे राजकीय डावपेच आहेत, याबाबत कयास लावले जात आहेत.