Neelam Gorhe : दिल्लीमध्ये पार पडलेल्या मराठी साहित्य संमेलनात शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यांच्या विधानावर ठाकरे गटाने जोरदार टीका केली असून, संजय राऊत यांनी गोऱ्हेंवर गंभीर आरोप केले आहेत.
यावर शिंदे गट आक्रमक झाला असून पुण्यातील अलका चौकात संजय राऊत यांच्या विरोधात आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आंदोलनादरम्यान शिंदे गटाचे पुण्याचे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनी मोठे गौप्यस्फोट केले आहेत.
शिंदे गटाचा आरोप – स्थायी समिती सदस्यत्वासाठी २५ लाखांची मागणी
शिंदे गटाचे नेते नाना भानगिरे यांनी संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप करताना सांगितले की, “बाळा कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्थायी समिती सदस्यत्वासाठी २५ लाखांची मागणी केली होती. त्यातील ५ लाखांची एन्ट्रीही झाली होती. काही नगरसेवकांना निधी मिळण्यासाठीही पैसे द्यावे लागत होते. पक्षातील मोठ्या पदांसाठी काय सुरू होते, याचा अंदाज यावरून येतो,” असे ते म्हणाले.
तसेच, “आम्हाला काही मागितले गेले, म्हणजे उच्च पदांसाठी नक्कीच काही दिले गेले असेल. नीलम गोऱ्हे यांचे वक्तव्य योग्य असून, आम्ही त्यांना पाठिंबा देतो,” असे भानगिरे यांनी स्पष्ट केले.
संजय राऊत यांचा घणाघात – “नीलम गोऱ्हेंचं वक्तव्य म्हणजे विकृती”
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, “नीलम गोऱ्हेंचं वक्तव्य म्हणजे विकृती आहे. त्या पक्षातून जाताना घाण करून गेल्या. त्या अतिशय विश्वासघातकी आहेत.”
याशिवाय मराठी साहित्य महामंडळाने नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्यावर माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, “साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांना नीलम गोऱ्हे यांच्या कार्यक्रमासाठी ५० लाख रुपये दिल्याची कबुली त्यांनी स्वतः दिली आहे. याचे सर्व पुरावे आमच्याकडे आहेत,” असा दावा संजय राऊत यांनी केला.
राजकीय वातावरण अजून तापण्याची शक्यता
या वादामुळे शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता आहे. संजय राऊत आणि नीलम गोऱ्हे यांच्यातील वादावर दोन्ही गट आपापली भूमिका लावून धरत आहेत. पुण्यात झालेल्या आंदोलनानंतर हा वाद आणखी पेटण्याची चिन्हे आहेत.