ताज्या बातम्याराजकारण

Amit Shah : राजकीय वातावरण तापले! अमित शहांच्या ‘त्या’ प्लानवर भाजप ॲक्टीव्ह; अजितदादा, शिंदेंसाठी धोक्याची घंटा

Amit Shah : लोकसभा आणि विधानसभा निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढवल्यानंतर भारतीय जनता पक्षाने आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी स्वबळाची तयारी सुरू केली आहे. सर्वोच्च न्यायालय ओबीसी आरक्षणासंदर्भात कधीही निर्णय देऊ शकते, आणि त्यानंतर त्वरित निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपच्या राज्य नेतृत्वाने जिल्हा पातळीवर कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

स्वबळावर लढण्याच्या हालचाली गतिमान

लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका नेत्यांची असतात, तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाच्या असतात. त्यामुळे इच्छुकांची संख्या जास्त असल्याने भाजपने स्वबळावर लढण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. पक्षाने ‘एकला चलो रे’ या रणनीतीवर भर देण्याचे संकेत दिले असून, जिल्हा पातळीवरील पदाधिकाऱ्यांना यासाठी तयारी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

भाजपच्या बैठकीत स्वबळाचा निर्धार

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुणे, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, अकोला आणि इतर जिल्ह्यांचा दौरा करत पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. पक्षाच्या ताकदीचा आढावा घेत संघटन मजबूत करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. “प्रत्येक पक्ष आपला विस्तार करू शकतो, आम्हीदेखील त्याच दिशेने काम करत आहोत,” असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

‘मिशन शतप्रतिशत’च्या दिशेने वाटचाल

भाजपने राज्यात विधानसभेत १३२ जागा जिंकत उच्चांकी यश मिळवले. आता पक्षाने ‘मिशन शतप्रतिशत’ च्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान अमित शहा यांनी २०२९ मध्ये स्वबळावर लढण्याचा संकल्प व्यक्त केला होता. त्याच दिशेने आता भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी स्वतंत्र लढतीचे संकेत दिले आहेत.

स्वबळावर लढण्याची दाट शक्यता

भाजपच्या अंतर्गत संघटनेतून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येताच निवडणुका घोषित होतील, आणि त्यानंतर भाजप स्वबळावर ताकद अजमावणार आहे. त्यामुळे भाजप महायुतीच्या जोडीने स्वतंत्र रणनीती आखत आहे का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Back to top button