Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. ही भेट बावनकुळे यांच्या शासकीय निवासस्थानी झाल्याचे समोर आले आहे. जयंत पाटील यांनी या भेटीचे कारण फक्त त्यांच्या मतदारसंघातील महसूलविषयक समस्या आणि विकासकामांबाबत चर्चा करणे हेच असल्याचे स्पष्ट केले आहे.
बावनकुळे यांची प्रतिक्रिया
या भेटीबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांनीही स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, “जयंत पाटील हे त्यांच्या मतदारसंघाशी संबंधित १४-१५ प्रश्न घेऊन आले होते. त्यांनी सांगली जिल्ह्यातील विकासकामांबद्दल चर्चा केली. ही केवळ प्रशासकीय बैठक होती, यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही.”
बावनकुळे यांनी पुढे स्पष्ट केले की, “मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलही या चर्चेत सहभागी होते. जयंत पाटील यांनी उपस्थित केलेले प्रश्न महत्त्वाचे होते आणि मी येणाऱ्या अधिवेशनात सांगलीच्या समस्या सोडवण्यासाठी बैठक बोलावणार आहे.”
भेटीमुळे चर्चांना उधाण
ही भेट राजकीय नव्हती, असा दावा दोन्ही नेत्यांनी केला असला तरी जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्या या भेटीने त्या चर्चांना नवी धार मिळाली आहे.
“जयंत पाटील यांच्या राजकीय भवितव्यावर मी बोलू शकत नाही” – बावनकुळे
या भेटीबाबत विचारले असता बावनकुळे म्हणाले, “मी जयंत पाटलांच्या राजकीय भवितव्यावर बोलण्याइतका मोठा माणूस नाही.” मात्र, त्यांच्या या विधानाने उलट अधिक चर्चा रंगू लागल्या आहेत.
आता पुढील काही दिवसांत जयंत पाटील यांच्या राजकीय भूमिकेत काही बदल होतो का, ते भाजपच्या वाटेवर जातात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.