R. Ashwin : भारतीय क्रिकेट संघात खेळाडूंना फक्त क्रिकेटपटू म्हणून नव्हे, तर सुपरस्टार म्हणून पाहिले जाते. चाहते आपल्या आवडत्या खेळाडूंना देवासारखी प्रतिष्ठा देतात, त्यामुळे संघ व्यवस्थापनही काही मोठ्या नावांना संघातून वगळण्यास टाळाटाळ करतं. याच मुद्द्यावर टीम इंडियाचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने आपली नाराजी व्यक्त केली आहे.
अश्विनचा स्पष्ट इशारा – ‘सुपरस्टार संस्कृतीतून बाहेर पडा’
अश्विनने भारतीय क्रिकेटमधील ‘सुपरस्टार संस्कृती’वर टीका करत खेळाडूंनी स्वतःला देव समजणे बंद करावे, असे म्हटले आहे. आपल्या यूट्यूब चॅनल ‘ऐश की बात’ वर बोलताना तो म्हणाला, “भारतीय क्रिकेटपटूंनी साधेपणा स्वीकारावा आणि स्वतःला सुपरस्टार किंवा सेलिब्रिटी न मानता फक्त खेळावर लक्ष केंद्रित करावे.”
विराट-रोहितच्या शतकांकडे ‘सामान्य’ यश म्हणून बघा
भारताचा सर्वात यशस्वी ऑफस्पिनर अश्विन (७६५ आंतरराष्ट्रीय बळी) म्हणाला की, “विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यासारख्या दिग्गजांनी शतके ठोकणे ही नवीन गोष्ट नाही, ते आधीच बऱ्याच वेळा हे करून दाखवले आहे. त्यामुळे त्यांच्या शतकांना काहीतरी वेगळं किंवा मोठं यश मानण्याची गरज नाही.”
“क्रिकेटपटू आहोत, सुपरस्टार नाही!” – अश्विन
अश्विन पुढे म्हणाला, “भारतीय क्रिकेटमध्ये स्थिती सामान्य ठेवण्याची गरज आहे. आपण अभिनेते किंवा सुपरस्टार नाही, आपण खेळाडू आहोत. त्यामुळे सामान्य माणसाला आमच्याशी जोडता आले पाहिजे, तो आम्हाला समजला पाहिजे. भारतीय संघाने ‘सुपरस्टार संस्कृती’ सोडून द्यायला हवी.”
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ५ फिरकीपटूंच्या निवडीवर प्रश्नचिन्ह
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात ५ फिरकीपटूंचा समावेश करण्यात आला आहे. यावर अश्विनने आश्चर्य व्यक्त करत म्हटले, “दुबईसारख्या ठिकाणी पाच फिरकीपटूंची निवड कितपत योग्य आहे, हे स्पष्ट नाही. मला वाटतं की दोन अतिरिक्त फिरकीपटू निवडण्यात आले आहेत.”
गौतम गंभीरनेही केली होती टीका
भारतीय संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनीही संघातील ‘सुपरस्टार संस्कृती’वर नुकतीच टीका केली होती. आता अश्विननेही त्यावर भाष्य करत आपली नाराजी व्यक्त केली आहे.
भारतीय संघाला भविष्यात अधिक यशस्वी व्हायचे असेल, तर त्यांना या ‘सुपरस्टार’ मानसिकतेतून बाहेर पडावे लागेल, असेच संकेत अश्विनने दिले आहेत.